ज्ञानेश्वर हरिपाठ
ज्ञानेश्वर हरिपाठ
आताच डाउनलोड करा श्री ज्ञानदेव हरिपाठ संत ज्ञानेश्वरांसाठी
श्री ज्ञानदेव हरिपाठ रोज सकाळी आंघॊळ केल्यावर वाचावा . ह्या ऍप्प च्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना श्री ज्ञानदेव हरिपाठ शिकवू शकता. श्री ज्ञानदेव हरिपाठ वाचल्याने लहान मुलांवर चांगले संस्कार होतात.
मुख्य वैशिट्ये :-
* श्री ज्ञानदेव हरिपाठ वाचण्याकरिता प्ले स्टोर मधील सर्वात सोपे ऍप्प
* संत ज्ञानेश्वर ह्यांच्यासाठी श्री ज्ञानदेव हरिपाठ
* इंटरनेट/डेटा नसले तरी चालणारे.
* आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविणारे ऍप्प
ज्ञानेश्वर हरिपाठ
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान मकर कुंडले तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजीन तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने
॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
॥ तीन ॥
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
॥ चार ॥
भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
॥ पाच ॥
योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
॥ सहा ॥
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
॥
सात ॥
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
॥ आठ ॥
संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
॥ नऊ ॥
विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
॥ दहा ॥
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
॥ अकरा ॥
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे याचे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
॥ बारा ॥
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥
॥ तेरा ॥
समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
॥ चौदा ॥
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
॥ पंधरा ॥
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥
॥ सोळा ॥
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
॥ सतरा ॥
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥
॥
अठरा ॥
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥
॥
एकोणीस ॥
वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
॥ विस ॥
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
॥ एकविस ॥
काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥
॥ बाविस ॥
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥
॥ तेविस ॥
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
॥ चौविस ॥
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥
॥ पंचविस ॥
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
॥ सव्वीस ॥
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
॥ सत्तावीस ॥
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
॥ अठ्ठावीस ॥
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥
अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥
श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
॥ एकोणतीस ॥
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥१॥
मी तूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंदामाधवा याच देहीं ॥२॥
देहीं ध्यातां ध्यान त्रिपुटींवेगळा । सहस्र दळी उगवला सूर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योति । या नांवे रूपें तीं तुम्ही जाणा ॥४॥
॥ तीस ॥
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींची ॥१॥
न लगती सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥२॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥३॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥
यावीण असतां आणीक साधन । वाहातसें आण विठोबाची ॥५॥
तूका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥
॥ एकतीस ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुंण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरी ॥४॥
श्री ज्ञानदेव हरिपाठ संपुर्ण